अकोला : तामिळनाडू राज्यातील सामाजिक कार्यकर्ता तथा भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी अकोला जिल्ह्यात २०१७ मध्ये सुरू केलेला ‘एक जन्म-एक वृक्ष’ पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू झाल्यानंतर, आता हा उपक्रम शेजारच्या राज्यांमध्येही लागू करण्याच्या हालचाली नाथन यांनी सुरु केल्या आहेत. त्यासंदर्भात झारखंड राज्यातील अधिकाऱ्यांसोबत प्राथमिक स्तरावरील बोलणी सुरु झाली असून, इतर शेजारच्या राज्यांमध्येही हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.‘एक जन्म-एक वृक्ष’ मोहिमेची अंमलबजावणी आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण राज्यात जून २०१८ पासून करण्याच्या सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी १४ मे रोजी दिल्या होत्या. तेव्हापासून राज्यभरात ही मोहीम फोफावली आहे. या मोहिमेंतर्गत ज्या कुटुंबात नवजात बालकांचा जन्म होईल, त्या कुटुंबाच्यावतीने एका वृक्षाची लागवड करण्यात येते. राज्यात आतापर्यंत जवळपास दीड लाख वृक्षांची लागवड या उपक्रमाअंतर्गत झाल्यानंतर उत्साह दुणावलेल्या नाथन यांनी महाराष्ट्राच्या शेजारी राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. पुण्यातील त्यांच्या ओळखीच्या न्यायाधिशांमार्फत त्यांनी झारखंडमधील एका न्यायाधिशांसोबत संपर्क साधून आपल्या उपक्रमाची माहीती दिली. सदर न्यायाधिशांनी या उपक्रमाबाबत सकारात्मकता दर्शविली असून, त्यांच्या माध्यमातून झारखंड राज्यातील सचिवस्तरावरील अधिकाºयांसोबत संपर्क साधणार असल्याचे नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राज्यात दीड लाख झाडे लावलीराज्यातील सर्वच जिल्ह्यांत १ जून ते ३१ सप्टेंबर या कालावधीत जवळपास दीड लाख झाडांचे रोपण करण्यात आल्याचा दावा ए. एस. नाथन यांनी केला आहे.