- अतुल जयस्वालअकोला: गत सात वर्षांपासून वृक्ष संवर्धनासाठी झटणारे भारत वृक्ष क्रांती मिशनचे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून समोर आलेला ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम आता राज्याच्या सीमा ओलांडून उत्तराखंडमध्ये पोहोचला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा हा ‘अकोला पॅटर्न’ उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात राबविण्याच्या सूचना मुख्य विकास अधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मूळचे तामिळनाडू राज्यातील असलेले ए. एस. नाथन यांनी ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम हातात घेतला असून, महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तो राबविण्यात येत आहे. राज्यात मिळालेल्या प्रतिसादानंतर नाथन यांनी उत्तराखंड राज्यात हा उपक्रम सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून नाथन यांनी अल्मोडाचे जिल्हाधिकारी नितीन भदोरिया व मुख्य विकास अधिकारी मनुज गोयल यांची भेट घेऊन त्यांना आपली संकल्पना समजावून सांगितली व ती या जिल्ह्यात एक मोहीम म्हणून राबविण्याची विनंती केली. या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेत मुख्य विकास अधिकारी मनुज गोयल यांनी अल्मोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या कोसी पुनर्वसन अभियानासोबत ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ या उपक्रमाची सांगड घालण्याच्या सूचना ७ डिसेंबर रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे दिल्या आहेत.काय आहे एक विद्यार्थी-एक वृक्ष’ उपक्रम...
- विद्यार्थ्यांना सोयीच्या ठिकाणी किंवा जेथे वृक्षाचे संगोपन चांगल्या प्रकारे होईल, अशा ठिकाणी झाड लावण्याची मुभा द्यावी.
- विद्यार्थ्याने लावलेल्या झाडास त्याचे नाव द्यावे व त्या विद्यार्थ्याचा वाढदिवस त्या झाडासोबत करण्याबाबत प्रेरणा द्यावी.
- विद्यार्थ्यांनी दरमहा झाडाची स्थिती जाणून घ्यावी, एखादे झाड सुकल्यास त्याजागी दुसरे झाड लावावे.
- लावलेल्या झाडाचे चांगले संगोपन करणाºया विद्यार्थ्यांची नोंद घेऊन त्याची नोंद कार्यानुभव विषयाच्या गुणांत करावी.
संपूर्ण देशात राबविण्याचा मानस‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ हा उपक्रम संपूर्ण देशात लागू करण्याच्या उद्देशाने नाथन यांनी पंतप्रधान कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांचीही भेट घेतली. आपली संकल्पना ऐकून घेतल्यानंतर परदेशी यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.