अकोला/बाश्रीटाकळी: महान धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याने पाणीपुरवठय़ाचे काटेकोरपणे नियोजन करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली असतानाच बुधवारी पहाटे कान्हेरी सरप गावानजिक शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पूर आल्याचे चित्र ग्रामस्थांना पहावयास मिळाले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, किमान तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.महान धरण ते अकोला शहरापर्यंत ९00 मि.मी.व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे जाळे टाकण्यात आले आहे. बुधवारी पहाटे चार वाजता शहरातील जलकुंभात पाणी पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु जलकुंभात उशिराने पाणी पोहोचत असल्याचे महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना शोध घेण्याचे निर्देश दिल्यानंतर सकाळी ६ वाजता कान्हेरी सरप गावानजिक मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे उजेडात आले. ९00 मी. मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचा दाब प्रचंड असल्याने शेतानजिकच्या नाल्यांना अक्षरश: पुर आला होता. पहाटे चार वाजतापासून सुरू झालेली गळती जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत सुरू होती. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेल्याचा अंदाज मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.