अकोला : सदैव साथ देणारी आपली सावली मंगळवार, २३ मे रोजी मंगळवारी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी अचानक काही क्षणांसाठी नाहीशी झाल्याचा अनुभव अकोलेकरांना आला. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा असे वर्षातून दोन दिवस शून्य सावली दिनाचे येत असल्याचे खगोल अभ्यासक सांगतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. अकोलेकरांना दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी शून्य सावलीची अनुभूती घेता आली. अकाेल्यातील जुन्या बसस्थानकावर भर उन्हात लाेकांची सावली गायब झाली हाेती.
जिल्ह्यात शून्य सावलीचे दिवस
आपल्या जिल्ह्यात या अनोख्या खगोलीय घटनेचा आरंभ दक्षिण भागाकडून उत्तर बाजूस पुढे सरकत जाईल. २४ मे रोजी दहिहांडा, चोहोट्टा, अंदुरा, हाता या पूर्णा नदीच्या पट्ट्यात व २५ मे रोजी तेल्हारा, अडगाव, अकोट, सावरा या भागांतील लोकांना शून्य सावलीचा अनुभव दुपारी स्थान परत्वे दुपारी १२:१६ ते १२:१९ मिनिटांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना अवश्य घेता येईल.
कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात. ज्यावेळी सूर्य आणि पृथ्वी यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते तिथे शून्य सावली दिवस घडतो.-प्रभाकर दोड, ज्येष्ठ खगोल अभ्यासक, अकोला