अकोला : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अकोला शहरातील लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित पाचदिवसीय महोत्सवात रविवारी प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी 'गीतरामायण' सादर करून अकोलेकरांना मंत्रमुग्ध केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित 'शिवसोहळा' हे महानाट्य सादर करण्यात करण्यात आले. या महानाट्याचे सादरीकरण रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, आदी मान्यवरांसह रसिक उपस्थित होते. प्रसिद्ध गायक श्रीधर फडके व सहकाऱ्यांनी सुमधुर स्वरात 'गीतरामायण' गाऊन श्रीरामकथा सादर केली. 'दशरथा, हे घे पायसदान', 'सेतू बांधा रे सागरी' अशा अनेक रचनांनी श्री रामचरित्रातील अनेक प्रसंग जिवंत केले. यावेळी उपस्थित रसिक भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
महानाट्यातून उभा केला ‘श्री शिवकाळ’
सह्याद्री फौंडेशनच्या वतीने ‘शिवसोहळा’ हे महानाट्य सादर करण्यात आले. त्यामध्ये शिवचरित्राचा भव्य पट, तत्कालीन वेशभूषा, अनेक कलावंत, हत्ती, घोडे, अप्रतिम नेपथ्य, आदी भव्य सादरीकरणातून मंचावर श्री शिवकाळ डोळ्यांसमोर उभा करण्यात आला. शिवरायांचे बालपण, तत्कालीन राजकारण, अंतर्गत संघर्ष, मॉँसाहेब जिजाऊ यांनी दिलेली शिकवण, संस्कार, रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्यस्थापनेचा निर्धार, जिवाला जीव देणारे मावळे, युद्धातील पराक्रम, प्राणांची बाजी लावून निर्माण केलेले स्वराज्य अशा अनेक प्रसंगांतून शिवचरित्र साकारण्यात आले. कलावंतांचा जबरदस्त अभिनय, नेपथ्य, अप्रतिम गाणी, भव्य स्टेज व त्यापुढील जागेचा वापर करून या भव्य सादरीकरणाने अकोलेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नीलेश जळमकर यांचे दिग्दर्शन होते. प्रारंभी स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा गौरव करण्यात आला.