ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 19 - अकोला येथे महावितरणच्या पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण व मंजूर कामांचे भूमिपूजना प्रसंगी उर्जा मंत्री चंद्रेशखर बावनकुळे यांनी अनेक योजना पूर्ण करीत असल्याचे सांगत कोटयावधी रूपयांच्या नवीन योजनांची घोषणा अकोलेकरांसाठी केल्याने सर्वच लोकप्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
पारस येथे जुन्या विज निर्मिती संचाऐवजी आता केवळ एकच नवा संच उभारण्यात येणार असून त्यांची क्षमता ६५० मेगा वॅट राहणार आहे. यासंदर्भात सर्व शक्यता तपासून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी जो प्रस्ताव येईल त्याला तातडीने मंजूरीला पाठवण्यात येईल तसेच कृषी पंपाची प्रतीक्षा यादी दूर करण्याचे उद्दीष्ट पूर्ण करतांना प्रत्येक शेतक-याला फाईव्हस्टार विज पंप देण्याबाबतच्या सूचना महावितरणच्या अधिका-यांना केल्या.
यावेळी लोकप्रतिनिधींनी दिलेले प्रस्ताव मान्य करीत असल्याचे सांगत अकोला महानगरपालिकेच्या थकित वीज बीलावरील दंड सध्या भरण्याची आवश्यकता नाही त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल उर्वरीत रक्कम १४ हप्त्यामध्ये फेडण्याची सवलतही उर्जामंत्र्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे, बळीराम सिरस्कार, रणधीर सावरकर, हरिष पिंपळे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे आदी उपस्थित होते.