अकाेला: काेराेनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांनी दुखणे अंगावर न काढता तातडीने चाचणी करणे क्रमप्राप्त असताना तसे हाेत नसल्याचे दिसत आहे़. मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत घसरण झाल्याचे समाेर आले आहे़. शुक्रवारी केवळ ९६२ जणांनी चाचणी केली़. यादरम्यान, १७१ जण काेराेना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़.
जिल्हाभरात तसेच महापालिका क्षेत्रात जीवघेण्या काेराेना विषाणूचा फैलाव झाला असून घराेघरी काेराेना बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ मार्च महिन्यांत दुकाने उघडी करण्यासाठी व्यावसायिकांना व त्यांच्या दुकानांमधील कामगारांना काेराेना चाचणी अनिवार्य करण्यात आली हाेती़. त्यावेळी चाचणी करण्यासाठी व्यावसायिकांची एकच झुंबड उडाली हाेती़. त्यामुळे चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली हाेती़. ६ मार्च पासून चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे काेराेना बाधितांचाही आकडा समाेर येउ लागला हाेता़. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दैनंदिन चाचणी करणाऱ्यांची संख्या सुमारे २ हजार पेक्षा अधिक हाेती. मे महिन्यात चाचणी करणाऱ्यांच्या संख्येत घसरण आल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये दरराेज १ हजार पेक्षा कमी नागरिक चाचणी करीत असल्याची आकडेवारी आहे. आठवडा भरापासून हा आकडा ९००च्या घरात आला आहे. शुक्रवारी ९६२ जणांनी चाचणी केली असून यामध्ये केवळ २५४ जणांनी आरटीपीसीआर तसेच ७०८ जणांनी रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली आहे.
म्हणून बाधितांची संख्या झाली कमी !
काेराेनाची लक्षणे आढळून येणारे संशयित रुग्ण काेराेना चाचणी न करता दुखने अंगावर काढत आहेत. चाचणी न केल्यास अधिकृत बाधितांची संख्याही आपसूकच कमी होणार असून ही धाेक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करने गरजेचे झाले आहे.
मनपा आयुक्तांनी दिले निर्देश
कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही नागरिक चाचणी करीत नसल्याची बाब मनपाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी चाचन्या वाढविन्यासाठी झोन अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत.