अकोला: शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सोमवारी शहरातील विविध चाचणी केंद्रांत अकोलेकरांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यावेळी तब्बल १,७९४ जणांनी नाकातील स्रावाचे नमुने दिले. यादरम्यान, महापालिकेला जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त अहवालानुसार शहरातील तब्बल ३२३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
मागील काही दिवसांपासून महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाच्यावतीने झोननिहाय चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच फिरत्या चार व्हॅनद्वारे नागरिकांची चाचणी केली जात आहे. सोमवारी पूर्व झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी २३२ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी एकूण २५० स्वॅब घेण्यात आले. यामधून ११ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले असून २३९ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पश्चिम झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी २११ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आणि रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी एकूण २५० स्वॅब घेण्यात आले. त्यामधून २ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह प्राप्त झाले आणि २४८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उत्तर झोन अंतर्गत आरटीपीसीआर चाचणीसाठी ८१ आणि रॅपिड ॲन्टीजेन चाचणीसाठी एकूण ५७१ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून २३ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. व ५४८ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दक्षिण झोन अंतर्गत रॅपिड ॲन्टीजेनसाठी एकूण १९९ स्वॅब घेण्यात आले असून त्यामधून १३ नागरिकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह असून १८६ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
शहरात सर्वत्र प्रादुर्भाव
महापालिकेला सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त झालेला अहवाल लक्षात घेता कोरोनाचा संपूर्ण शहरात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंत सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील पूर्व व दक्षिण झोनच्या बरोबरीत पश्चिम व उत्तर झोन आल्याचे समोर आले आहे. यामध्ये पूर्व झोन अंतर्गत ८२, पश्चिम झोन अंतर्गत ८५, उत्तर झोन अंतर्गत ८० आणि दक्षिण झोन अंतर्गत ७६ असे एकूण ३२३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.