अकोला : श्रावण महिना म्हणजे शिवभक्तांसाठी एक उत्सवच असतो. अकोल्यातील या लोकोत्सवाला ७0 वर्षांची परंपरा लाभली आहे. दरवर्षी या उत्सवाचे स्वरूप व्यापक होत आहे. शेकडो शिवभक्त मंडळ कावडीद्वारे पूर्णा नदीवरून जल आणून राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. या कावड व पालखी यात्रेकरूंची स्वागत करण्याची अनोखी परंपरा अकोल्यात वर्षानुवर्षांपासून पार पाडली जाते. यावर्षीही शहरातील राजकीय पक्षांसोबतच सामाजिक संघटनांनीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत शिवभक्तांचे जल्लोषात स्वागत केले. सोमवार सकाळपासून कावड यात्रेकरूंचे गांधीग्रामवरून आगमन होण्यास प्रारंभ झाला. थकून-भागून आलेल्या शिवभक्तांसाठी कुणी जलपान, फराळ, चहा, खिचडी, भोजनाचे आयोजन केले होते. शिवभक्तांच्या स्वागताचा प्रारंभ आकोट फैलपासून झाला. शिवाजी पार्कजवळ महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक सुरेश अंधारे यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. मनकर्णा प्लॉट येथे कृषी उत्पन्न बाजार समिती हमाल, मापारी कामगार युनियनच्यावतीने चना उसळ, भवानीपेठ मंडळातर्फे खिचडी, चहा व पाण्याचे वितरण करण्यात आले. बगेरे परिवारातर्फे खिचडी वाटप, टिळक रोडवर श्री वीरशैव लिंगायत समाज व बसव विचार समिती, छावा व गांधी चौक नवयुवक मंडळातर्फे पाणी वितरण करण्यात आले. गांधी चौकामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे शिवभक्तांना नारळ व शेला देऊन सत्कार करण्यात आला. जयहिंद चौक येथे श्री योगायोग मंडळातर्फे चहाचे तर भाजपतर्फे नगरसेवक सतीश ढगे, राजराजेश्वर पालखी उत्सव शांतता समितीचे अध्यक्ष अमर डिकाव, उपाध्यक्ष अश्विन पांडे यांच्या हस्ते कावड प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. पप्पू वानखडे व कुटुंबीयांतर्फे राजराजेश्वर महाराजांची पूजा करून भाविकांना खिचडीचे वितरण करण्यात आले. राजराजेश्वर मंदिराजवळ काली महाराजांच्यावतीने भाविकांचे स्वागत करून प्रसादाचे वितरण करण्यात आले.
काँग्रेसतर्फे शिवभक्तांचे स्वागत
कोतवाली चौकामध्ये शहर काँग्रेसच्यावतीने महानगराध्यक्ष मदन भरगड यांनी पालखीतील शिवभक्तांचे स्वागत केले. प्रारंभी त्यांनी राजराजेश्वराच्या मानाच्या पालखीचे पूजन करून यात्रेतील भाविकांना प्रसादाचे वितरण केले. कोतवाली चौकात काँग्रेसच्यावतीने भव्य शामियाना उभारण्यात आला होता.
बालशिवभक्त मंडळांची संख्या वाढली
मोठय़ा शिवभक्त मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून, चिमुकली मुलेही त्यांचे अनुकरण करू लागली आहेत. गांधीग्राम येथे जाऊन कावडीने पाणी आणणार्या बालशिवभक्त मंडळांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यंदाच्या कावड यात्रा उत्सवांमध्ये ३0 च्या जवळपास बालशिवभक्त मंडळ त्यांच्या लहान, परंतु आकर्षक सजावट केलेल्या पालख्या घेऊन कावड यात्रेत सहभागी झाले होते.