रस्त्याचे काम काही भागात पूर्ण झाले तर काही भागात एकाच बाजूने रस्त्यावर पावसामुळे दगड उघडे पडल्याने अपघातात वाढ झाली आहे. अनेक वेळा या रस्त्यावर मोठमोठे अपघात घडले असून काही रस्त्यामुळे जीवितहानी सुद्धा झाली आहे. या मार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण केले आहे. काही ठिकाणी अर्धवट एका बाजूचे काम कासवगतीने चालू आहे. पावसाळ्यात महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. उन्हाळ्यात वाहनधारकांना रस्त्यावरील धुळीचा सामना करावा लागतो. रस्त्याची दुरवस्था झाली असून, अकोट वरून अकोला जाण्यासाठी दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो.
फोटो :
रस्ता दुरूस्तीला आणखी किती वर्ष लागतील.
सद्यस्थितीत रस्त्याचे काँक्रिटीकरण अंदाजे १५ किलोमीटर पर्यंत पूर्ण झाले असून या कामाला सहा वर्षांचा कालावधी लागला आहे. उर्वरित ३५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणास आणखी किती वर्ष लागणार असा सवाल उपस्थित होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अकोट आगाराची एमएच १४ वाय ५७१४ क्रमांकाची बस गाडी पळसोद जवळ उलटली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
लोकप्रतिनिधी ढीम्मच!
अकोट - अकोला मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, सातत्याने रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे. या रस्त्यावर आता आणखी किती बळी जाण्याची वाट अधिकारी व लोकप्रतिनिधी पाहात आहेत. असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची कामातील दिरंगाई पाहता लोकप्रतिनिधींचा वचक संपला की काय ? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.