लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ते खंडवा या मीटरगेज लोहमार्गाचा अकोला- अकोट हा जवळपास ४५ किलोमीटरचा पट्टा ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित होऊन या मार्गाची सुरक्षा चाचणीही यशस्वी झाली आहे. अकोट ते खंडवापर्यंतचे गेज परिवर्तन रखडलेले असल्यामुळे अकोला ते खंडवा अशी रेल्वे धावण्याची सध्या तरी शक्यता नाही. त्यामुळे तयार असलेल्या अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी नियमितपणे रेल्वे चालविण्यात यावी, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.दक्षिण-मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांपैकी असलेल्या अकोला ते अकोटदरम्यानच्या ४४.७० किलोमीटर लांबीच्या गेज परिवर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. गेज परिवर्तन होण्यापूर्वी अकोला ते खंडवापर्यंतच्या मीटरगेज मार्गावरून दररोज चार पॅसेंजर गाड्या चालविण्यात येत होत्या. उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात सरळ व जवळचा लोहमार्ग असलेल्या अकोला ते खंडवापर्यंतचे गेज परिवर्तन करण्याच्या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर १ जानेवारीपासून हा मार्ग बंद झाला. गत साडेतीन वर्षात अकोला ते अकोटपर्यंत ब्रॉडगेजचे काम पुलांसह पूर्ण करण्यात आले. या मार्गावरील स्थानकांचेही नूतनीकरण करण्यात येत असून, अकोला रेल्वेस्थानकावर गत महिन्यातच रिमॉडेलिंगचे कामही पूर्ण करण्यात आले.ही सर्व सज्जता झाल्यानंतर २३ व २४ जुलै रोजी अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गाची पाहणी करण्यात येऊन ताशी ११० किमी वेगाने चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या मार्गावरून लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी नियमितपणे पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यास अकोट शहर व तालुक्यातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी येणे अधिक सोयीस्कर होणार आहे.
पूर्णा-अकोला पॅसेंजरचा वाढू शकतो टप्पाअकोला ते पूर्णा हा मार्ग आधीपासूनच ब्रॉडगेज झाला असून, या मार्गावरून दररोज पूर्णा ते अकोला व परळी ते अकोला अशा पॅसेंजर गाड्या दररोज चालतात. आता अकोटपर्यंत ब्रॉडगेज झाल्याने या पॅसेंजर गाड्यांचा टप्पा अकोटपर्यंत वाढविला जाऊ शकतो. तसेच आठवड्यातून एकदा चालणारी काचीगुडा-अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस गाडीही अकोटपर्यंत वाढविली जाऊ शकते.
डेमू किंवा शटल गाडीचाही पर्यायजिल्ह्यात अकोलानंतर अकोट हे शहर मोठे असून, तेथून दररोज मोठ्या संख्येने लोक अकोल्याला येतात. या मार्गावर खामगाव-जलंबच्य धर्तीवर दोन डब्ब्यांचे शटल चालविल्या जाऊ शकते. शिवाय वर्धा-अमरावती डेमू गाडीचा टप्पा अकोटपर्यंत वाढाविल्यास जनतेचा फायदा होऊ शकतो.
अकोला-अकोट रस्ता वानधारकांसाठी डोकेदुखीअकोला ते अकोटपर्यंतच्या ४५ किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गत तीन वर्षांपासून सुरू आहे. अकोटपर्यंतचा रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, हे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. रस्त्याचे ५० टक्क्यांपेक्षाही अधिक काम बाकी असून, आणखी दोन वर्षे पूर्ण होण्याची शक्यता नाही. या मार्गावरून जाताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अकोला ते अकोट रेल्वे सुरू झाल्यास नागरिकांचा त्रास कमी होईल.