अकोट : भाजप-काँग्रेसमध्ये बंडखोरी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:54 PM2019-10-05T12:54:58+5:302019-10-05T12:55:05+5:30
अकोट विधानसभा मतदारसंघ बंडखोरी टाळण्यास भाजपा व काँग्रेस या पक्षाला यश आले.
- विजय शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अकोट विधानसभा मतदारसंघ बंडखोरी टाळण्यास भाजपा व काँग्रेस या पक्षाला यश आले; मात्र महायुतीतील शिवसेना पक्ष व वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकविले. अकोट मतदारसंघात सध्यातरी चौरंगी लढतीचे वारे वाहू लागले आहे.
अकोट मतदारसंघात २२ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या महायुतीचे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसचे संजय बोडखे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष रहाटे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रवींद्र फाटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तुषार फुंडकर यांच्यासह विविध उमेदवारांचा समावेश आहे. अकोट मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असल्याने स्थानिक व विकासाच्या मुद्यावरून मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; परंतु नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपा व काँग्रेस या पक्षांमधील अन्य प्रभावी नेता पदाधिकाऱ्याने बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला नाही. प्रकाश भारसाकळे विद्यमान आमदार असताना अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने भारसाकळे यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी होऊ नये म्हणून पक्षश्रेष्ठींनी प्रारंभीपासून वातावरण हाताळल्याने यशस्वी झाले तर काँग्रेसमध्ये बोडखे व गणगणे परिवारातील कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळणार, याकरिता दोन्ही कुटुंब मुंबई-दिल्लीत ठाण मांडून होते; परंतु गणगणे कुटुंबीयातील महेश गणगणे यांनी या निवडणुकीतून यशस्वी माघार घेतल्याने संजय बोडखे यांचा मार्ग सुकर झाला. हे दोन्ही कुटुंब काँग्रेसच्या विजयासाठी मनापासून एकत्र येतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अकोट मतदारसंघ शिवसेनेकडे राहावा, यासाठी या परिसरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची अख्खी फौज मुंबईत तळ ठोकून होती; परंतु हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अनिल गावंडे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून प्रवेश केला होता; परंतु हा मतदारसंघ भाजपाकडे गेल्याने अनिल गावंडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीने सर्वात शेवटी उमेदवार जाहीर केला असला तरी वंचितच्या शोभा शेळके यांनी अपक्ष अर्ज दाखल करुन बंडाचे संकेत दिले आहेत. या प्रमुख उमेदवारांमुळे मतदारसंघात बहूरंगी लढतीचे चित्र दिसत असून अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर लढाईचे चित्र आणखी स्पष्ट होईल.