लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या गावाचं पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आलं; परंतु या गावात आदिवासी बांधवांना सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. जंगलवस्ती सोडल्यानंतर पुनर्वसित गावात सुविधा नसल्याने या गावात आरोग्य व अस्वस्थतेच्या कारणांमुळे चार वर्षात २२८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या पुनर्वसनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोणा, धारगड या सहा गावांचे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सन २०११ ते २०१५ यादरम्यान टप्प्याटप्प्याने पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करतेवेळी आदिवासी बांधवांना मूलभूत सोयी-सुविधेपासून तर आर्थिक सक्षमता व उदरनिर्वाहापर्यंतचे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र प्रति कुटुंब १० लाखाच्या वर कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुनर्वसित गावात देण्यात आल्या नाहीत.वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सर्वप्रथम पुनर्वसित आठ गावांना पुरविणे आवश्यक होते. मात्र, त्या सुविधा त्यांना मिळाल्याच नसल्याने या गावांमध्ये मृत्यूचा दर वाढला असून, त्यामध्ये तरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अकोट तालुक्यातील दहीखेल फुटकर येथे गुल्लरघाट या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावाचा आढावा घेतला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुल्लरघाट येथे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सहा युवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गुल्लरघाट व धारगड येथे कागदोपत्रीच ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे.२२८ जणांच्या मृत्यूची नोंद नाहीगत चार वर्षांत मृतांमध्ये गुल्लरघाट १२ मृत्यूमध्ये सहा युवक, अमोना येथे नऊ मृत्यूपैकी दोन युवक,धारगड ४२ मृत्यूपैकी २० युवक, सोमठाणा खुर्द १० पैकी तीन युवक, केलापाणी १२ पैकी नऊ युवक, नगरतास १३ पैकी ९ युवक, बारूखेडा ६६ पैकी २५ युवक, सोमठाणा ६४ पैकी ३० युवक असे एकूण आठ गावांत २२८ मृत्यूसंख्येत ३० ते ३५ वयोगटातील १०४ युवकांचा समावेश आहे. या २२८ जणांच्या मृत्युची नोंदही कुठेच नाही. बुधवार १६ आॅगस्टला पुनर्वसित केलपानी येथे झालेल्या आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा आकडा पुढे आला.पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सुविधा पुरविण्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.- प्रमोद लाकरा,उपवनसंरक्षक,अकोट वन्यजीव विभाग
अकोटातील पुनर्वसित गावात मृत्यूचे तांडव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:19 AM