आठवडी बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
चोहोट्टा बाजार: येथील दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजारात पंचक्रोशीत ओळखला जातो. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर आठवडी बाजारामध्ये व्यापारी, नागरीक बेपर्वा वावरत असल्याचे दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहेत.
वन्य प्राण्यांमुळे शेतकरी हतबल
अडगाव बु.: अडगाव परिसरात शेतकऱ्यांना यंदा हरभऱ्याची लागवड केली. परंतु शेतात वन्य प्राणी शिरकाव करीत असून, हरभरा पिकावर ताव मारीत आहेत. काळवीट, हरीण, रोही, रानडुकरांनी शेतांमध्ये उच्छाद मांडला आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भांबेरी ते तेल्हारा रस्त्याची दुरवस्था
भांबेरी: दापुरा फाटा ते भांबेरी आणि तेल्हारा फाट्यापर्यंत दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु वर्षभरातच रस्त्यावरचे डांबर व गिट्टी उडाली. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहेत. या रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
म्हैसांग परिसरात अवैध दारू विक्रीला ऊत
म्हैसांग: म्हैसांग गावालगतच्या राज्य मागार्गावर एका हॉटेलमध्ये दिवसरात्र अवैध दारू विक्री होत आहे. याकडे बोरगाव मंजू पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. या हॉटेलमधून मद्यपींना देशी, विदेशी दारूचा चढ्या दराने पुरवठा करण्यात येतो. येथील अवैध दारू विक्रीविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.