आकोट (जि. अकोला) : तुरळक स्वरुपात बरसणारा पाऊस ४ जुलै रोजी आकोट शहरासह परिसरात जोरदार बरसला. दुपारपासून पावसाने आकोट शहर व ग्रामीण परिसरात हजेरी लावली. धुवाँधार झालेल्या पावसाने नदी-नाले वाहू लागले तर मोहाळीला आलेल्या पुराने हिवरखेड मार्ग बंद पडला होता. शेतातील पेरण्यासुध्दा खोळंबल्या. ग्रामीण भागात सार्वत्रिक पाऊस झाल्याने नदी-नाल्यांसह रस्त्यावरून पाणी वाहत होते. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात व शेतशिवारात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सकाळी शेतावर गेलेले मजूर दुपारी परतले. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. पावसामुळे आकोट शहरालगत असलेल्या मोहाळी नदीला पूर आल्याने हिवरखेड मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. सोमवारी आलेल्या पावसामुळे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी-नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाल्याने त्या पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असल्याचे चित्र होते. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुध्दा खंडित झाला होता. अनेक भागात मोबाईलचे टॉवर सुध्दा काही काळाकरिता बंद पडले होते. उशिरा रात्रीपर्यंंत पावसाची रिपरिप सुरुच होती.
आकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2016 1:19 AM