आरोपी युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचा: शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
अकोला : वृद्धासोबत कोणताही वाद नसताना, निष्कारण मद्यपी युवकाने ६५ वर्षीय गणपत फकीरसा डगवाळे यांच्यावर कुदळ व फावड्याने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. आरोपी अमोल ज्ञानेश्वर बिल्लेवार (२२ रा. जवळा बु.) हा गुन्हेगार प्रवृत्तीचा असून, तो दारूच्या नशेत अनेकांसोबत वाद घालून त्यांना मारहाण करीत असल्याच्या पोलिसांकडे तक्रारी होत्या. दारूच्या नशेतच त्याने गणपत डगवाळे यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी आरोपी अमोल याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बोरगाव खुर्द येथील कैलास डगवाळे (४५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील गणपत डगवाळे हे जवळा येथील शेतशिवारामध्ये रमेशलाल राधाकिसन चौधरी यांच्या शेतात रखवालीचे काम करीत. सोमवारी रात्री ९ वाजता सुमारास आरोपी अमोल बिल्लेवार हा दारूच्या नशेत शेतात गेला. या ठिकाणी रखवालदार गणपत डगवाळे यांच्याकडे गेल्यावर आरोपीने त्यांना प्यायला पाणी मागितले; परंतु आरोपी हा दारूच्या नशेत धुंद असल्याचे पाहून गणपत डगवाळे यांनी त्यास पाणी देण्यास नकार दिला. यावरून अमोलने त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांच्या छातीवर, डोक्यावर आणि डोळ्यावर कुदळ व फावड्याने जबर प्रहार केले. या मारहाणीत गणपत डगवाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला; परंतु त्याला शेताकडे जाताना काही साक्षीदारांनी बघितले होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल बिल्लेवार याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने हत्या केल्याचे कबूल केले. त्याला नवव्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. नन्नावरे यांच्या न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ एम.के. ठोसर यांनी, तर आरोपीतर्फे अॅड. केशव एच. गिरी यांनी बाजू मांडली.