अकोला: लोकसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधीपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी)नुसार मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘कोरड दिवस’ म्हणून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जाहीर करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहेत.लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात येते. तद्वतच मतदानापूर्वीचे ४८ तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे २४ तास मद्य विक्री किरण्यात येणारी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदेशी मद्य, देशी दारू , ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून, उल्लंघन करणाऱ्याचा परवाना (अनुज्ञप्ती) रद्द करण्यात येईल. त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.या काळातील तीन दिवस कोरड जाहीर करण्याबाबत उपरोक्त कलमान्वये तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात एकूण चार टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे. वाशिम-यवतमाळ ११ एप्रिल, १८ एप्रिल रोजी अकोला व बुलडाणा लोकसभा मतदान होईल. मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे.