अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊनला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याच्या पृष्ठभूमिवर संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठातील सर्व विभाग, बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज व विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंदच राहणार असल्याच्या सूचना ३० जून रोजी जारी करण्यात आल्या. तथापि, या काळात शिक्षक, संशोधक, संवैधानिक अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी बोलवायचे किंवा कसे, यासंदर्भातील निर्णय महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यात लॉकडाऊनच्या नियमांच्या अधिन राहून या कालावधीत शिक्षक, संशोधक, विद्यापीठाच्या प्रशासकीय विभागातील संवैधानिक अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुख्यालय न सोडता घरी राहून (वर्क फ्रॉम होम) संबंधित विभागाचे कामकाज करावे. तथापी, कोणत्याही आवश्यक कार्यालयीन कामकाजाकरिता लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या १५ टक्के उपस्थितीच्या अधीन राहून आळीपाळीने विभागामध्ये बोलवावे, तसेच नियंत्रण अधिकारी यांनी दररोज आळीपाळीने विभागात कामाकरिता बोलावण्यात येणार असलेल्या कर्मचाºयांची यादी उपकुलसचिव (आस्थापना) यांना न चुकता सादर करावी. संबंधित शिक्षक, संशोधक, संवैधानिक अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांना कार्यालयात बोलाविल्यास त्यांना हजर राहावे लागेल, असेही या आदेशात म्हटले आहे. कार्यालयात असताना कर्मचाºयांनी कोविड-१९ च्या संदर्भात घ्यावयाची खबरदारी व नियमांचे पालन करणे अनिवार्य राहील, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.