मूर्तिजापूर : मूर्तिजापूर शहरातील रस्त्यावर असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस ५ एप्रिलला सुरुवात होऊन अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली होती. ६ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरूच ठेवत बसस्थानक परिसर व रेल्वे स्टेशन विभागातील अनेक अवैध बांधकामे हटवून भुईसपाट करण्यात आली.यापूर्वी बरेचदा अतिक्रमण हटाव कार्यक्रम नगरपालिका प्रशासनाने थातूर-मातूर पद्धतीने राबविला आहे, त्यामुळे यावेळीसुद्धा पायंडा म्हणून रस्त्यावरील चहा टपरी तथा छोटी - मोठी दुकाने हटविली जातील, असा शहरवासीयांचा अंदाज होता; परंतु यावेळी धनदांडग्यांसह सर्वच अतिक्रमणे हटविण्यात आल्यामुळे मूर्तिजापूर नगरवासीयांचा अंदाज पूर्णत: चुकला असल्याचे दिसून आले आहे. यावेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविणाऱ्या गजराजाने शहरातील धनदांडग्यांनाच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील लोकांची अतिक्रमित बांधकामेसुद्धा पाडून लाखो रुपयांच्या साहित्याचा चुराडा केला. अभूतपूर्व अशी अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिका प्रशासनाने राबविली असली, तरी त्याचा शहरात हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य मजुरांच्या रोजगारावरदेखील जबर परिणाम झाला आहे.या मोहिमेमध्ये मुख्याधिकारी नगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ठाणेदार गजानन पडघन व त्यांच्या अधिपत्याखाली पोलीस बंदोबस्त होता.अतिक्रमण हटाव मोहिमेच्या दरम्यान विद्युत सेवा दिवसभर बंद ठेवून मूर्तिजापूरकरांना नगरपालिकेने वेठीस धरण्यात आले. परिणामी, सामान्य नागरिकांची गैरसोय झाली.---