अकोला : अकोल्यात दुबईतून आलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे युवतीच्या संपर्कातील पाच जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र त्या युवतीचे पुण्याला पाठविण्यात आलेल्या ‘एनआरए’ सॅम्पलचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने ‘ओमायक्रॉन’चं सावट अजूनही कायम आहे.
राज्यात ओमायक्रॉन रुग्णांची वाढती संख्या धडकी भरविणारी आहे. अशातच गत आठवड्यात शेजारील बुलडाणा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आठवडा होत नाही, तोच अकोल्यात दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी युवतीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाकडून युवतीच्या संपर्कातील पाचही जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पाचही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदेशातून आलेल्या त्या युवतीला कुठल्याही प्रकारचे लक्षण नसल्याने आरोग्य विभागातर्फे तिला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले.
५१ जणांशी अजूनही संपर्क नाही. विदेशातून आलेल्या २७९ लोकांपैकी २०८ लोकांशी आरोग्य यंत्रणेचा संपर्क झाला आहे. २० जण इतर जिल्ह्यांतील आहेत. जिल्ह्यात आलेल्यांपैकी ५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह असून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दुसरीकडे सुमारे ५१ जणांशी आरोग्य विभागाचा अजूनही संपर्क झालेला नसल्याने चिंता वाढली आहे.
अकोलेकरांनो सावधान!
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी ओमायक्रॉनचं संकट कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी बेफिकिरी न बाळगता कोविड नियमांचे पालन करण्याची गरज आहे. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतला नाही, अशांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे.
दुबईतून आलेल्या एका रुग्णाचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, ओमायक्रॉनच्या निदानासाठी रुग्णाचे आरएनए सॅम्पल पुण्याला पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांची देखील चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.
- डॉ. अस्मिता पाठक, आरोग्य अधिकारी, मनपा आरोग्य विभाग, अकोला