अकोला: देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी बार्शीटाकळी येथे २४ ते २७ जानेवारी या कालावधीत अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजन समितीचे खजिनदार प्रा.डॉ. संतोष हुशे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.मधुकर पवार क्रीडा व बहूद्देशीय मंडळाच्यावतीने आयोजित या स्पर्धेत देशातील १७ राज्यातील पुरुषांचे २४ आणि महिलांचे १६ संघ सहभागी होणार आहेत. कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या केळीवेळी हे गाव ज्या जिल्ह्यात आहे, त्याच अकोला जिल्ह्याला अखिल भारतीय स्पर्धा आयोजनाचा बहुमान दुसऱ्यांदा आणि बार्शीटाकळी या अविकसित तालुक्याला प्रथमच मिळाला आहे. स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर पवार आहेत. प्राचार्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. याकरिता विविध समित्यांचे गठण केले असल्याचेही प्रा. हुशे यांनी सांगितले.स्पर्धेतील विजेते आणि उत्कृष्ट कबड्डीपटू यांच्यावर एकूण १० लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. पुरुष व महिला संघातील प्रथम विजेता संघाला १ लाख ५१ हजार रुपये रोख आणि शिल्ड, द्वितीय संघाला ७१ हजार रोख आणि शिल्ड, तृतीय संघाला ५१ हजार आणि शिल्ड असे बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने देशात प्रथमच महिला संघाला पुरू ष संघाच्या बरोबरीने बक्षिसाची रक्कम देण्यात येत आहे. स्पर्धेत पुणे, हरयाणा, रत्नागिरी, मुंबई, अमरावती, अकोला, नागपूर, हरिद्वार, दिल्ली, सिकंदराबाद, इंदौर, राजस्थान, गुजरात, यवतमाळ, वाशिम, बार्शीटाकळी, कोल्हापूर, सांगली, सातारा, उज्जैन, छत्तीसगड येथील संघ सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेला अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, ज्येष्ठ कबड्डीपटू डॉ. राजकुमार बुले, राष्ट्रीय पंच रामभाऊ अहिर उपस्थित होते.