अकोला : कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही खिडकीवरील जनरल तिकीट, तसेच रेल्वेकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती बंदच आहेत. रेल्वेद्वारे आगामी काही दिवसांत सर्व निर्बंध शिथिल केले जात असून, येत्या २९ जूनपासून खिडकीवरील जनरल तिकिटासह इतर सर्व सोयीसवलती सुरू होणार असल्याची माहिती सोमवारी (९ मे) रोजी अकोला रेल्वेस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पॅसेंजर ॲमेनिटी कमिटी (पीएसी)ने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रेल्वे बोर्डाचे डॉ. राजेंद्र फडके, कैलास वर्मा व विभा अवस्थी यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीने सोमवारी अकोला रेल्वेस्थानकावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला. अकोला रेल्वेस्थानकावरील समस्या व आवश्यक सोयीसुविधांबाबत लोकप्रतिनिधी व विविध संघटनांच्या शिष्टमंडळांचे मुद्दे ऐकून घेतल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. रेल्वेस्थानकाची पाहणी करताना लोकमतने छेडले असता, डॉ. राजेंद्र फडके म्हणाले, की कोरोना काळापूर्वी दिल्या जाणाऱ्या सवलती व सुविधा बंद असल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. याची दखल घेत रेल्वे बोर्ड २९ जूनपर्यंत हळूहळू सर्वच निर्बंध शिथिल करणार आहे. त्यानंतर प्रवाशांना जनरल तिकिटासह सर्वच सोयीसवलती पुन्हा मिळणार असल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाला सुनावले खडे बोल
समितीला भेटण्यासाठी आलेल्या भाजप लोकप्रतिनिधी व इतर संघटनांच्या शिष्टमंडळांनी रेल्वेस्थानकावरील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर समितीचे सदस्य डॉ. राजेंद्र फडके यांनी रेल्वेस्थानक प्रशासनासह पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत रेल्वेस्थनकावरील समस्या दूर करण्याबाबत सूचना केल्या. रेल्वेस्थानक परिसरातील पार्किंगची समस्या, वाहने चोरीस जाणे, किरकोळ चोऱ्या, प्लॅटफाॅर्मवरील किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आदी समस्या तातडीने मार्गी लावण्याच्या डॉ. राजेंद्र फडके यांनी दिल्या.
भाजप प्रतिनिधी मंडळाने मांडले प्रस्ताव
खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने समितीच्या सदस्यांची भेट घेत रेल्वे स्थानक व रेल्वे सुविधांबाबत काही प्रस्ताव मांडले. या प्रतिनिधी मंडळात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह माजी महापौर विजय अग्रवाल, संजय धोत्रे यांचे स्वीय सहायक गजानन लोणकर, वसंत बाछुका, राजकुमार बिलाला, नीकेश गुप्ता, ॲड. सुभाषसिंह ठाकूर, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, रूपेश राठी, उन्मेश मालू, गिरीश जोशी यांचा समावेश होता. आमदार रणधीर सावरकर यांनी विविध मुद्दे उपस्थित करत अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये अकोल्याचा आरक्षण कोटा वाढविणे, वाहनतळाचा विस्तार करणे, होम प्लॅटफाॅर्म, सरकते जिने (एस्कलेटर) तसेच लिफ्टचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली. वसंत बाछुका, राजकुमार बिलाला आणि सुभाषसिंह ठाकूर यांनीही रेल्वे स्थानकावरील सोयी-सुविधांकडे समितीचे लक्ष वेधले.
अकोला-अकोट रेल्वे लवकरच
पीएसीचे सदस्य कैलास वर्मा यांनी सांगितले की, अकोला ते अकोट गेज परिवर्तन झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी झालेली असून, ही पाहणी यशस्वी झाली आहे. येत्या २० मे रोजी होणार असलेल्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत हा मुद्दा मांडला जाईल. त्यानंतर काही महिन्यांमध्ये या मार्गावर रेल्वे चालविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय अकोला रेल्वे स्थानक परिसरात फेस रीडिंग कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही कैलास वर्मा यांनी स्टेशन प्रशासनाला दिले.