अकोला: अरिवल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ संचलित विदर्भ मुख्याध्यापक संघाने महाराष्ट्राचे शिक्षण संचालक गंगाधर ममाने यांना एका निवेदनाद्वारे विदर्भातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या १ मेपासून देण्यात याव्या, अशी मागणी केली असल्याचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुध्न बिरकड यांनी सांगितले आहे.महाराष्ट्रामधील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा शुभारंभ वेळेवर विदर्भातील शाळा २६ जून तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकण येथील शाळा १५ जूनपासून सुरू होत असतात; मात्र उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये एकसूत्रता नसून विर्दभातील माध्यमिक शाळांना वेगवेगळ्या प्रकारे सुट्या दिल्या जात आहे. अकोल्यातील माध्यमिक शाळांना सुट्या १० मे ला, वाशिममधील शाळांना १२ मे ला याशिवाय विदभातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या सुट्या दिल्या जात आहेत. यामध्ये शाळा शुभारंभ ज्याप्रमाणे वेळेवर विदर्भात एकाच वेळी होतो त्याचप्रमाणे शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या चालू सत्रात सन २०१९-२०२० मध्ये १ मे पासूनच देण्यात याव्यात. याबाबत शिक्षण संचालकांनी उपसंचालकांना तसे आदेश द्यावेत, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याबाबत विदर्भ मुख्याध्यापक संघाची सभा झाली. सभेला विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, सचिव सतीश जगताप, कार्याध्यक्ष अशोक पारधी, उपाध्यक्ष मंदा उमाटे, विनोद संगीतराव, विलास भारसाकळे,रामप्रसाद धावडे, सहसचिव दिनेश तायडे, साखरकर, मंगेश धानोरकर, गडचिरोलीचे संजय नारलावार, अकोला विदर्भ प्रतिनिधी बळीराम झामरे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रकाश बुमकाळे, वाशिमचे अध्यक्ष नरवाडे, वर्धा सचिव बारस्कर, अमरावतीचे कार्याध्यक्ष चापडे, गोंदिया महिला प्रतिनिधी रजिया बेग, नागपूरच्या विभा भुसारी, बुलडाण्याच्या प्रवीणा शाह यांची उपस्थिती होती.