अकोला- वंचित समाज सत्तेत जाऊ शकला नाही. त्यांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळू शकले नाही. या समाजाचा आतापर्यंत वापर करण्यात आला आता वंचीत समाज जागा झाला आहे. महाराष्ट्रात आम्ही दोन अधिवेशन घेतल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्थापन केली असून धर्मनिरपेक्ष विचारांसोबत निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसला आम्ही १२ जागांचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसकडून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद आला नाही भविष्यात तो न आल्यास महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.वंचीत बहूजन आघाडीच्या संवाद यात्रेच्या निमित्ताने ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.वंचित समाजाला गेल्या ६८ वर्षात न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष खदखदतो आहे. सत्तेत गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत याची जाणीव वंचितांना व्हायला लागली. सर्वच सत्ता पक्षांनी वापर केला असल्याची जाणीव त्यांना झाली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील वंचित बहुजनांची मुठ बांधून सत्ता संपादनाचा निर्धार केला आहे. त्याअनुषंगाने धनगर समाज व भटक्या विमुक्त समाजाचे दोन अधिवेशन झालीत आहेत. या समाजाची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे. माळी, धनगर, मुस्लीम, भटक्या विमुक्त, ओबीसीमधील अती मागास व मागासवर्गीय अशा जातींना प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून १२ जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. या मागणीबाबत अजून काँग्रेसकडून कोणतीही चर्चा नाही. काँग्रेसने प्रस्ताव न स्विकारल्यास ४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने प्रस्ताव नाकारल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढणार - अॅड. आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 1:03 PM
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही उमेदवार उभे करू अशी घोषणा भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केली.
ठळक मुद्देमतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस सोबत आघाडीचा पर्याय खुला ठेवला आहे.४८ लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून राज्यभर दौरे व मेळावे यांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.