अकोला : टीळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २०१७ मध्ये एका कचरा वेचणाऱ्या ११ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर पाशवी अत्याचार करणाºया तीन नराधमांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास आणखी शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये १५ एप्रिल २०१७ रोजी एका ११ वर्षीय चिमुकलीवर आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तीन नराधमांनी सामुहीक बलात्कार केला होता. या अत्याचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. घटनेनंतर तीन दिवसांनी १८ एप्रिल २०१७ रोजी यातील आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तीन नराधमांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत, तर या प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादास १ आॅगस्ट २०१९ पासून प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुरुवात झाली होती. त्यांच्या न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणातील तीनही आरोपींना दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच चिमुकलीला दहा लाख रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी असेही आदेशात नमुद आहे.