अकोला: अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील रहिवासी असलेल्या आईनेच तिच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह अन्वी मिर्झापूर येथील एका तरुणाशी लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बोरगाव मंजूचे ठाणेदार हरीश गवळी यांनी तातडीने तीनही आरोपींना अटक केली. यामध्ये अल्पवयीन मुलीची आई, तिच्याशी विवाह करणारा नितीन उंबरकर आणि त्याची आई ऊर्मिला उंबरकर यांना अटक करण्यात आली आहे.भातकुली तालुक्यातील रहिवासी एका १४ वर्षीय मुलीचे आई-वडील सात ते आठ वर्षांपासून विभक्त राहत होते. तेव्हापासून त्यांची मुलगी वडिलांसोबत राहत होती. आता ती मुलगी १४ वर्षांची झाली. दरम्यान, आईने मुलीला एक स्मार्टफोन घेऊन दिला. तिच्याशी संपर्क करून तिला अकोला जिल्ह्यातील घरी बोलाविले. त्यानंतर आईने मुलीसाठी अन्वी मिर्झापूर येथील स्थळ पाहून तेथील एका मंदिरात मुलीचा विवाह नितीन दुर्याेधन उंबरकर याच्याशी लावून दिला. यासाठी नितीनला त्याची आई ऊर्मिला हिने सहकार्य केले. बालविवाह गुन्हा असल्याचे माहिती असतानाही अल्पवयीन मुलीच्या आईसह नितीन व त्याची आई या तिघांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीचे लग्न लावले. त्यानंतर ती नितीनकडे गेल्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तिला घरात डांबून ठेवले. या सर्व घटनेबाबत मुलीचे वडील अनभिज्ञ होते. मुलगी बेपत्ता असल्याचे पाहून त्यांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, वडिलांना मुलीचा फोन कॉल आला. बाबा मला वाचवा, मला आईने विकले, असे तिने वडिलांना सांगितले. त्यामुळे वडील अमरावती जिल्ह्यातील भातकुली पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेले होते; मात्र पोलिसांनी हाकलून लावले; मात्र तिच्या वडिलांनी हार न मानता अखेर अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईसह नितीन उंबरकर व त्याची आई ऊर्मिला उंबरकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३४२, ३४ सहकलम ४, ६ पोस्को व कलम ६ बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना तातडीने अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.