शेगाव : अकोला जिल्ह्यातील माना आणि कुरूम परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रेल्वे रूळाखालील गिट्टी वाहून गेली. त्यामुळे नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या बडनेरा स्थानकाच्या पलिकडे आहे त्याच िठकाणी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. बराच वेळेपासून वाहतूक विस्कळीत झाली असून, काही प्रवाशांनी खासगी वाहनांने मुंबईकडे प्रवास सुरू केल्याचे समजते. तसेच शेगाव रेल्वे स्थानकात आरक्षीत तिकीटे रद्द करण्यासाठी रात्री उशीरा एकच गर्दी झाली होती.
अमरावती आणि अकोला जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस झाला. माना नजीक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. माना ते कुरूम दरम्यान रेल्वे रूळाखालील मातीसह गिट्टी मोठ्या प्रमाणात वाहून गेली. ही बाब रेल्वे रूळाचे पर्यवेक्षण करणार्या कर्मचार्याच्या निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. परिणामी, नागपूर कडून मुंबई जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या. तर मुंबईकडून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्या अकोला, वाशिम मार्गे वळविण्यात आल्या. त्याचवेळी काही रेल्वे सुरक्षीत ठिकाणी थांबिवण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे बराचवेळ मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशी तात्कळत होते. अनेकांनी आपले रिझर्वेशन रद्द करून पर्यायी वाहतुकीच्या साधनांचा वापर केल्याचे समजते.
बडनेराकडून अकोलाकडे येणार्या रेल्वे मार्गावर ही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून युध्दपातळीवर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोहन देशपांडे स्टेशन प्रबंधक, शेगाव.