पहाडसिंगी येथील शेतकरी मांगू रामजी चव्हाण यांच्या शेत सर्व्हे नंबर ९८ / अ साडे अकरा एकर शेत विश्वमित्र प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात गेले असून, सदर प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या क्षेत्रात मांगू चव्हाण, दरवर्षी पीक काढत असतात. परंतु या वर्षी त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे शेतात पेरणी केली नाही. त्याचा गैरफायदा घेऊन दोन जेसीबी मशीनद्वारे २२ मेपासून जवळपास तीन हजार ब्रास मातीचे उत्खनन करून ४५ ते ५० ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आल्याचा आरोप मांगू चव्हाण यांनी पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे तक्रारीतून केला आहे. २५ मे रोजी मांगू चव्हाण यांचा मुलगा संजय चव्हाण हा शेतात गेला असता, सदर प्रकार समोर आल्याने संजय चव्हाण यांनी जेसीबी मशीन चालकांना विचारपूस केली असता, त्यांनी परवाना असल्याचे सांगितले. संजय चव्हाण यांनी चान्नी पोलिस व तहसीलदार यांना माहिती दिली. पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि शेतकऱ्यांना संबंधित विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्याकडे तक्रार करून जेसीबी मशीन व ट्रॅक्टर मालकावर कारवाई करण्याची मागणी केली.
गाळ काढून शेतात टाकण्यासाठी परवानगीची गरज नाही. याबाबत त्या शेतकऱ्याचा फोन आला होता. गाळ काढण्याऐवजी मातीचेच अवैध उत्खनन झाले असेल तर पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
-दीपक बाजड, तहसीलदार पातूर
माझ्या पडीक शेतातील जेसीबी मशीनद्वारे जवळपास तीन हजार ब्रास मातीचे उत्खनन करून ४५ ते ५० ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आली. सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी.
-मांगू रामजी चव्हाण, शेतकरी सावरगाव