अकोला : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) च्या अकोला विभागीय कार्यालयातून विभागीय कार्यशाळेत झालेली बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ लिपिक प्रवीण तेलगोटे यांनी मंगळवार, २२ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांना दिले आहे.
विभागीय कार्यालयातून प्रशासकीय कारणावरून केलेली आपली बदली नियमबाह्य असल्याचा आरोप तेलगोटे यांनी निवेदनात केला आहे. बदली रद्द करण्याची मागणी मान्य न झाल्यामुळे अखेर तेलगोटे यांनी २२ ऑगस्टपासून विभागीय कार्यालयाच्या परिसरात बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. बदली रद्द न झाल्यास नाइलाजास्तव कुटुंबासह उपोषणाला बसावे लागणार असल्याचा इशारा तेलगोटे यांनी निवेदनातून दिला आहे. विभाग नियंत्रक व कामगार अधिकारी यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन चर्चा केली. परंतु, बदली रद्द झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार तेलगोटे यांनी व्यक्त केला.