- आशिष गावंडे
अकोला: राष्ट्रहित, विकासाला प्राधान्य देत शिवसेना व भाजपाने युतीवर शिक्कामोर्तब केले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य असून, महायुतीच्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार केला जाईल, यात तसुभरही शंका नसावी; परंतु ही युती केवळ लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपुरती कायम न ठेवता महापालिकेच्या राजकारणातही युतीचा विचार व्हावा, अशी भावना महायुतीच्या समन्वय बैठकीत शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी व्यक्त केली. या दरम्यान, सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दीक फटकेबाजी करीत यानिमित्ताने मनातील मळभ दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने युती केली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षांनी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवणे पसंत केले असले तरी सत्तेची फळे चाखण्यासाठी दोघांनीही हातमिळवणी केली. यानंतर राज्यात मोठा भाऊ कोण, या मुद्यावरून दोन्ही पक्षांत चांगलेच बिनसले. त्याचे पडसाद वेळोवेळी उमटले आणि त्यातूनच दोन्ही पक्षांमधील कटूता वाढत गेली. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी असो वा सोयाबीन, तूर-हरभºयाला अत्यल्प हमीभाव देण्याच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपवर प्रचंड हल्लाबोल करीत राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंतच न थांबता राज्यभरात शेतकरी हिताच्या आंदोलनांचा बिगुल फुंकल्याचे चित्र होते. सेनेच्या भूमिकेची गंभीर दखल घेत भाजपनेही सेनेला ठिकठिकाणी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. फेबु्रवारी २०१७ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने महापालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेसोबत निधी वाटपात भेदभाव करण्यासोबतच विकास कामांच्या उद्घाटनापासून सेनेला दूर ठेवल्याची भावना सेना नगरसेवकांच्या मनात निर्माण झाली. सोमवारी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठक ीत सेनेच्या मनातील ही खदखद बाहेर निघाली. या बैठकीत भाजप-सेनेसह महायुतीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.महापौर म्हणाले, पक्षादेशाचे पालन केले!ज्याप्रमाणे शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम मानतात, त्याप्रमाणेच मीसुद्धा महापालिकेच्या राजकारणात पक्षादेशाचे पालन केल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. दोन्ही पक्ष देशहितासाठी एकत्र आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.