अकोला: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश मिळावा, यासाठी यंदा थेट शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर निधी टाकून समितीलाच गणवेश खरेदीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी सव्वा दोन कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६७ हजार ७८0 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश आणि मोफत पाठय़पुस्तकांचे शाळा सुरू झाल्यावर वितरण करण्यात येणार आहे. येत्या २६ जूनपासून प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होत आहेत. त्यासाठी विविध शाळांनी नियोजन करून ठेवले आहे. जिल्हा परिषद शाळा, आदिवासी प्रकल्पाच्या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश आणि पुस्तके मिळावी, यासाठी धावपळ सुरू आहे. जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटपासाठी जिल्हास्तरावरून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर वितरित करण्यात येईल. तेथून तो निधी विद्यार्थीनिहाय त्या-त्या शाळांना वाटप होणार आहे. शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर विद्यार्थिसंख्यानिहाय निधी दिला जाणार आहे. प्रतिविद्यार्थी ४00 रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात येईल. .
गणवेशांसाठी सव्वा दोन कोटी रुपयांचे वाटप
By admin | Published: June 13, 2016 1:52 AM