लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाल्याने अकोला जिल्हय़ातील लाभार्थींना वाटप करण्यास प्रशासनाने नकार दिला. याप्रकरणी कारवाईतून वखारच्या अधिकारी-कर्मचार्यांना वाचविण्यासाठी तोच तांदूळ प्रतवारी सुधारण्याच्या नावाखाली धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविण्यात आला. प्रत्यक्षात त्याचे वाटप अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींना होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोल्यात खराब झालेला तांदूळ अमरावती जिल्हय़ातील लाभार्थींच्या माथी मारण्यात वखार महामंडळ यशस्वी झाले आहे.सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जाते. त्यासाठी राज्य शासन भारतीय खाद्य निगमकडून धान्याची खरेदी करते. धान्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय खाद्य निगमने अकोला एमआयडीसी परिसरातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम भाड्याने घेत तेथे साठा केला. जिल्हाधिकार्यांनी मागणी केल्यानुसार गहू, तांदुळाचा पुरवठा वखारच्या गोदामातून केला जातो. गेल्या दोन वर्षांत भारतीय खाद्य निगमने वखारच्या गोदामात साठा केलेल्या गहू, तांदुळाच्या साठय़ात हजारो क्विंटलची तफावत आली आहे. तसेच उपलब्ध साठय़ापैकी मोठय़ा प्रमाणात धान्य खराब झाले. ते धान्य जिल्हाधिकार्यांच्या शासकीय गोदामांतून लाभार्थींना वाटप करण्याची तयारी राज्य वखार महामंडळाच्या व्यवस्थापनाने केली; मात्र तांदूळ खराब असल्याने तो घेण्यास अकोला जिल्हा प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे डिसेंबर २0१७ पासून त्या गोदामातून धान्याची उचल बंद केली. त्यातच भारतीय खाद्य निगमने गोदामातील धान्य साठा शून्य करून दोन वर्षांतील धान्याचा हिशेब दिल्याशिवाय वखार महामंडळाच्या गोदामात नव्याने पुरवठा करणेही बंद केले. अडचणीत आलेल्या वखार महामंडळाने भारतीय खाद्य निगमला तांदुळाबाबत निर्णय घेण्यासाठी पत्रव्यवहार केला. त्यानुसार खाद्य निगमच्या तीन अधिकार्यांच्या पथकाने वखारच्या गोदामात १४ डिसेंबर रोजी धडक दिली. खराब झालेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गव्हाची पाहणी पथकाने केली.
खराब तांदळाची प्रत धामणगावात सुधारणार!वखार महामंडळाने खराब झालेल्या २६६२ क्विंटल तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी अकोल्याच्या गोदामातून धामणगाव रेल्वेच्या गोदामात हलविला. प्रत्यक्षात अमरावती जिल्हय़ाचा विस्तार आणि लाभार्थी संख्या पाहता त्यांना हा तांदूळ मिक्स करून वाटप करण्याचा डाव त्यामागे असल्याची माहिती आहे.
अकोल्यातील तूट कशी भरून काढणार!खाद्य निगमने अकोला जिल्हय़ासाठी दिलेल्या तांदुळापैकी २६६२ क्विंटल तांदूळ खराब झाला. तो धामणगावात हलविण्यात आला. त्यामुळे अकोला जिल्हय़ासाठी पुरवठा केलेल्या तांदुळातील तूट वखार महामंडळ कशी भरून देणार, हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. त्याचवेळी धामणगावात प्रतवारी सुधारून तांदूळ आणल्याचाही बनाव केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून वखारच्या अधिकारी-कर्मचार्यांना वाचविण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय खाद्य निगमने अकोल्यातील तांदुळाची प्रतवारी सुधारण्यासाठी धामणगावच्या गोदामात हलविण्याचे वखारच्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाला सांगितले. त्यानुसार तांदूळ हलविण्यात आला. - शि. र. अडकमोल, नवृत्त विभागीय व्यवस्थापक, वखार महामंडळ, अमरावती.