अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर शहरातील सर्व दुकानदार व त्यांच्या दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची कोविड चाचणी करून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान केली.
विविध व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन, लाॅकडाऊनमध्ये सर्वच दुकाने व प्रतिष्ठाने सुरू करण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने ॲड. आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याशी चर्चा केली. लाॅकडाऊन लागू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अकोला, अकोट व मूर्तिजापूर शहरातील सर्व दुकानदार, व्यावसायिक व विक्रेते आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची प्रशासनाने कोविड चाचणी करून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आलेल्या दुकानदारांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेेदरम्यान केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना आश्वस्त केले.