मूर्तिजापूर : घरापासून कोसोदूर असलेले अनेक वृद्ध आपल्या जीवनातील शेवटचे क्षण व्यतीत करीत आहेत. अनेक वृद्धांची आपल्या जवळच्या नातेवाइकांशी वर्षापासून भेटगाठ नसून, मुले व आप्तेष्ट वृद्धाश्रमाकडे फिरकले नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे, तसेच वृद्धाश्रमात मदतही आटल्याचे चित्र समोर आहे. येथील महात्मा फुले वृद्धाश्रमाला भेट दिली असता वृद्धाश्रमातील वृद्धांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपली करुण कहाणी ‘लोकमत’जवळ मांडली.
येथील म. फुले वृद्धाश्रम शासकीय मदतीने चालतो. बाहेरून येणारी मदत शून्य असली, तरी वृद्धाश्रमाचे संचालक मोठ्या कसरतीने वृद्धाश्रम चालवीत आहेत. मुलांनी व जवळच्या नातेवाइकांनी वाळीत टाकलेल्या वृद्धांचा भरणा अधिक दिसून आला. कोणी इंजिनिअर, कोणी अधिकारी, तर कोणी शिक्षक असूनही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे. कोरोनाने नातेवाईक दूर केले; परंतु वृद्धाश्रमात राहणारे आधीच समाज व नातेवाइकांपासून दूर आहेत. त्यांचे चार भिंतींआड असलेले जग या निमित्ताने सर्वच काही सांगून जाते. दोन मुले इंजिनिअर आहेत. सुनांसोबत पटले नाही म्हणून वीस वर्षांपासून वृद्धाश्रमात आहे. कुणीही भेटीला येत नाही. एक- दोन वेळा मुलगा भेटायला आला होता. घरच्यापेक्षा येथेच सेवा व काळजी घेतली जाते, पोरगं हायस्कूल मास्तर हाय, हे सून म्हंते मोठ्याकडं राय अन् लायनी म्हंते तिकडेच राय, अशी अवस्था असल्यानं आता कोणाकडं जावं, या विवंचेतून येथे आल्याचे एका स्थानिक शहरातील रहिवासी महिलेने सांगितले. आई- वडील नाहीत. पत्नी मरण पावली. दवाखान्यात कोणीतरी भरती केले व निराधार असल्याने येथेच राहतो, अशी व्यथाही एका वृद्धाने व्यक्त केली. मुलाने प्रेमविवाह केला. मुलगा घर सोडून गेला. सून कोठे गेली माहीत नाही. जवळचे नातेवाईक कोणी नाही. मावसभावाने येथे आणले. येथेच राहायचे आहे, अशी एक वृद्धा म्हणाली. कोरोनाने माणसातील माणुसकी आटली, हे खरे असले तरी वृद्धाश्रमात राहणारे, सामाजिक दुरी असलेलेच जीवन जगतात, शासन व संस्थेच्या मदतीतून त्यांचा निर्वाह चालतो, शासकीय अनुदान वेळेवर मिळत नाही, हे वास्तव असले तरी सामाजिक जाणीव ठेवून वृद्धाश्रम चालविला जातो.
--------------
आश्रमातील बहुतेक वृद्धांना कोणी भेटायला येत नाही. येथे अनेक वर्षांपासून वृद्ध वास्तव्यास आहेत. चार- पाच वर्षांत कोणी एखादा नातेवाईक भेटायला आला तर आला. कोरोनाकाळात गत वर्षापासून वृद्धांना कोणीही नातेवाईक भेटायला आला नसल्याचे वास्तव आहे. भेटणाऱ्यांची संख्या अर्थात शून्यावर आहे.
----------------
वृद्धाश्रम शासकीय मदतीवर चालतो. बाहेरून सामाजिक मदत एखाद्यावेळी धान्य स्वरूपात मिळते. सामाजिक मदत मिळत नसल्याने व शासकीय अनुदान वेळेवर मिळत नसल्याने बहुतेक मदतीचा ओघ आटला आहे. संचालकांवर अनेक वेळा पदरमोड करून वृद्धांची व्यवस्था करण्याची पाळी येते.
-------------------
गेली दोन वर्षे झालीत मी या वृद्धाश्रमात आहे. मी मूर्तिजापूर येथील असून, माझी दोन मुले आहेत. लहान मुलगा शिक्षक आहे, तर मोठा इतरत्र काम करतो. आतापर्यंत मोठ्या मुलाकडे राहिली. त्यामुळे लहान मुलगा स्वीकार करीत नाही.
-वृद्ध महिला
-------------
माझा एक मुलगा इंजिनिअर आहे आणि एकाचा चांगला व्यवसाय आहे. मी अनेक वर्षे झालीत या वृद्धाश्रमात आहे. सहा वर्षांपूर्वी मुलगा भेटायला आला होता. तेव्हापासून त्याची परत येण्याची वाट बघतो आहे.
-वृद्ध पुरुष
------------------
मुलगा आणि सून मला सोडून कुठेतरी निघून गेले. मला कोणाचाही आधार नसल्याने जीवन जगायचे कसे, असा मोठा प्रश्न पडला. एका जवळच्या नातेवाइकाने कारंजावरून वृद्धाश्रमत आणून ठेवले. गेली आठ वर्षे इथे राहत असल्याने आता हाच माझा शेवटचा आधार झाला आहे.
-वृद्ध महिला