सुमारे १०३ वर्षापूर्वी शिर्ला गावात पहिली शाळा भरली. त्यानंतर ६४ वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार मधुसूदन वैराळे यांच्या हस्ते शाळा इमारतीचा शिलान्यास करण्यात आला होता. मात्र काही वर्षांपूर्वी सर्व शिक्षा अभियान मोहिमेअंतर्गत वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता, सदर जागा आणि इमारत कमी पडू लागली होती. त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वर्ग १ ते ७पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन विमान इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे ६४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या इमारत पडीक अवस्थेत गेली होती. येथे असामाजिक तत्त्व या जागेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली होती. शाळेत शिक्षण घेऊन छोट्यापासून मोठ्या विविध शासकीय पदावर तथा उद्योगात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेची दुरवस्था पाहून मन खिन्न झाले. शिर्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा सोमपुरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे यांच्याकडे प्रकाश अंधारे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली व्यथा मांडली. त्यामुळे नारायणराव अंधारे यांनी गावकरी व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून शाळेची दुरुस्ती करून शाळेचा कायापालट केला. आता सर्वांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यातूनच मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीच्या भिंतीला रंगरंगोटी छप्पर आणि बसण्यासाठी फर्निचर आधी सुविधा या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने निर्माण केल्या.
विरंगुळा केंद्र १ ऑगस्टपासून
कधीकाळी शाळेत शिकलेले विद्यार्थी ते आता ज्येष्ठ नागरिक झाले आहेत. त्या सर्वांना पुन्हा आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तसेच तयार करण्यात आलेले विरंगुळा केंद्र येत्या १ ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. विरंगुळा केंद्र उभारणीसाठी शिर्ला ग्रामपंचायतीचे तत्कालीन प्रशासक उल्हास घुले, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील फाटकर, ग्रामपंचायत सदस्यांचे योगदान मिळत आहे.
युवकांसाठी स्पर्धा केंद्र उभारणार
पुनरुज्जीवन केलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा इमारतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम त्याबरोबरच तरुण युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सध्या शाळा बंद असल्यामुळे वर्ग १ ते ७च्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम या ठिकाणी आगामी काळात राबविला जाणार असल्याची माहिती प्रकाश अंधारे यांनी दिली.
290721\img_20210729_094545.jpg
कायापालट केलेली शाळा