लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अख्खे आयुष्य सर्मपित केलेल्या मूळचे राजंदा येथील त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर कौलखेड परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या सहवासात अनेक वर्ष राहिलेले त्र्यंबकराव आमले महाराज यांनी गुरुदेव सेवा मंडळाचा वसा अव्याहत चालू ठेवला. राष्ट्रसंत व गाडगेबाबांकडून घेतलेली विचारधारा पुढे नेण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले. राष्ट्रसंतांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, याकरिता संपूर्ण जीवन त्यांनी वाहून घेतले होते. गुरुदेव सेवा मंडळाने राष्ट्रीय कीर्तनाची परंपरा सुरू केली.यामध्ये ते आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. अगदी लहानपासूनच त्यांनी राष्ट्रसंतांच्या कार्याला सर्मपित होत गुरुदेव सेवा मंडळ म्हणजेच त्यांचा परिवार बनले होते. राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी गावोगावी प्रचार केला आहे. तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या गुरुदेव भक्तांची मोठी फळी आमले महाराज यांच्या मार्गदर्शनात तयार झाली आहे. गुरुदेव भक्त व सेवक निर्माण करण्यासाठी आमले महाराजांनी राज्यभर शिबिरे घेतली. प्रचारकांना मार्गदर्शन करून त्यांना हा वसा पुढे सुरू ठेवण्याचा मंत्र दिला. त्यांच्या मार्गदर्शनातील प्रचारकांनी हा वसा आता राज्यभर सुरू ठेवला आहे. तुकडोजी महाराजांच्या विचारांचा यज्ञकुंड अव्याहतपणे सुरूच राहील, यासाठी त्यांनी त्यांच्या शिष्यांना हा वसा चालविण्याचा गुरूमंत्र दिला आहे. आमले महाराजांच्या निधनाने गुरुदेव भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांची अंतिमयात्रा शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी न्यू खेतान नगर कौलखेडमधील भिसे यांच्या चक्कीजवळून सायंकाळी ४ वाजता कौलखेड मोक्षधामाकरिता निघणार आहे.
गुरुदेव सेवा मंडळाचे आद्य कीर्तनकार म्हणून आमले महाराज ओळखले जात. राज्यभर फिरून त्यांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार केला. महाराजांवर निष्ठा असलेले निस्वार्थ व्यक्तिमत्त्वाचे ते होते. समाजातील सर्व संतांचा आदर ठेवूनच त्यांनी कीर्तन केले. त्यागी, तपस्वी असलेल्या आमले महाराजांनी समाजाला सुसंस्कार देण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने गुरुदेव सेवा मंडळातील तेजस्वी तारा निखळला. - आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी.