अकोला - कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची वर्षा बंगल्यावरील बैठकीत मुख्यमंत्र्यांचे खासगी स्विय सहायकासोबत वाद हौऊन त्यांनी पी.ए.ला शिवीगाळ केली या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
"अब्दुल सत्तार ही विकृती आहे. ते कुठेही गेले तरी तसेच वागतील आता त्यांनी फक्त मुख्यमंत्र्यांच्या स्विय सहायकाला शिवीगाळ केलीय. पुढे आणखी कुणा-कुणाला करतील ते दिसेलच" असे सूचक वक्तव्य केले. दरम्यान दानवे यांनी अमृता फडणवीस यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही काय गमावले हे पाहण्यापेक्षा तुम्ही काय-काय गमावल ते पाहा, पती मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री पदावर आलेत. तुम्ही तुमचं बघा, आम्ही आमचं बघू, आमचं टेन्शन घेऊ नका, असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला.
दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा करून जिल्हयातील प्रश्नांचा आढावा घेतला. अकोल्यात गेल्या वर्षभरापासून शालेय पोषण आहार योजना बंद आहे याकडे लक्ष वेधत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अतिवृष्टी, पीक विमा मदत, शेतकऱ्यांना स्वस्त धान्य राशन योजना, तसेच जिल्ह्यातील समस्यांबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, आमदार व जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, तहसिलदार सुनिल पाटील, अकोला ग्रामीणचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आदी उपस्थित होते.