अकोला: मागील पाच वर्षांत भाजप सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली. त्याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना होत असून, कोणतीही योजना अमूक एका जाती समूहासाठी नसून, ती सर्वांसाठी असल्याचे सिद्ध झाले आहे. नेमकी हीच बाब विरोधकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दलित व मुस्लीम समाजात भाजपबद्दल भीती व संभ्रम निर्माण करण्याचे काम केल्याचे टीकास्त्र केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी सोडले. वाडेगाव येथे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार अॅड. संजय धोत्रे यांच्या जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित बहुजन आघाडीचा खरपूस समाचार घेतला.तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात सिंचन प्रकल्पांवर कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्प अर्धवट होते. प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून अक्षरश: दहा टक्के दराने कमिशन उकळण्यात आले. २०१४ मध्ये राज्यात सत्तापरिवर्तन होताच भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पाचे काम बंद करण्याचे पातक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी खा.संजय धोत्रे यांची तळमळ दिसून आली. त्यावेळी त्यांना कोट्यवधींचा निधी दिला. या प्रकल्पांचा फायदा अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील शेतकºयांना वीज कनेक्शन, सब स्टेशन, रोहित्रांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे काम भाजप-सेना सरकारने केले. केंद्र सरकारने योजनांचा लाभ देताना जातीपातीचे राजकारण केले नाही. ही विरोधकांची पोटदुखी असून, आजही त्यांचा आपसात मेळ नाही. देशाला स्थिर सरकार देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदारांना आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर खा.अॅड.संजय धोत्रे यांच्यासह भाजप-सेनेचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.