अकोला: ‘वंचित’ नावाने आघाडी स्थापन करून ते रिंगणात असले तरी वंचितांना न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे कोणतीही नीती नाही, धोरण नाही. केवळ मोदींना शिव्या देणे हाच त्यांचा एकमेव उद्योग आहे, अशा शब्दात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. अकोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकास योजनांचा लेखाजोखा मांडत अकोल्यासह राज्यभरातील मतदारसंघांत रिंगणात असलेल्या वंचित बहुजन आघाडीला ‘लक्ष्य’ केले. मुख्यमंत्री म्हणाले, की वंचित घटकांना एकत्र करीत त्यांनी आघाडी केली असली तरी या वंचितांना न्याय देण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. किंबहुना गेल्या पाच वर्षांत वंचितांना न्याय देण्याचे काम मोदींनीच केल्याचा दावा त्यांनी केला. अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे कोणतीही नीती नाही, कोणतेही धोरण नाही. अकोला जिल्हा परिषदेत गेल्या पंचवीस वर्षांत त्यांच्या हातात सत्ता आहे. या जिल्हा परिषदेचे त्यांनी वाटोळे केले. केवळ मोदींना शिव्या देण्यापलीकडे त्यांना दुसरे काही येत नाही. त्यांचे तेच धोरण आहे, असा अरोप मुख्यमंत्र्यांनी केला. गेल्या पाच वर्षांत देशामध्ये मोदी सरकारच्या कामाचा दबदबा निर्माण झाला आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्याचे काम मोदींनी केले. त्यामुळे येणारी निवडणूक ही गल्लीतली नाही तर दिल्लीतली आहे. देशाची शान, सुरक्षा व अस्मितेचे रक्षण करणाºया हातामध्ये देश सोपविण्यासाठीची ही लढाई असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने जाहीर केलेली ‘गरिबी हटाओ’ ही योजना हास्यास्पद असून, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मतांसाठी लाचार झालेले पत्रक आहे, अशी टीका त्यांनी केले. राहुल गांधी यांचे भाषण व नेतृत्व केवळ कल्पनेवर चालणारे तसेच मनोरंजन करणारे नेतृत्व असल्याचाही टोला त्यांनी लगावला. यावेळी मंचावर नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार विकास महात्मे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकरांकडे कोणतीच नीती नाही, धोरण नाही - मुख्यमंत्र्यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:44 PM