अकाेला: समाजात एकसंघपणा, सुसूत्रता येण्यासाठी व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी वास्तववादी साहित्य निर्माण करणे गरजेचे आहे, असा सूर अशाेक वाटिकेत भारतीय बाैद्ध महासभेतर्फे बुधवारी आयाेजित चर्चासत्रात उमटला.
सेवानिवृत्त आयएएस अधिकारी विश्वनाथ शेगांवकर यांच्या ‘तथागत बुद्ध : संक्षिप्त जीवन आणि दर्शन’ व ‘सुबोध बौद्ध विवाह विधी’ या दोन ग्रंथांच्या प्रकाशन साेहळ्यानिमित्त चर्चासत्राचे आयाेजन केले हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे हाेते. यावेळी प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, कवी आ. कि. सोनोने, वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. दिलीप सराटे, माजी बीडीओ व उद्योजक समाधान जगताप, लेखक विश्वनाथ शेगांवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्रिसरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रारंभी लता लोणारे यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
शेगांवकर यांच्या ग्रंथ लेखनातून समाजातील वास्तव टिपल्या गेले आहे. त्यांचे लेखन आंबेडकरी चळवळीसाठी दिशादर्शक असल्याचे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन महासचिव प्रा. डॉ. एम. आर. इंगळे यांनी केले. संस्कार विभागप्रमुख भाऊसाहेब थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विजय जाधव, किरण पळसपगार, सदाशिव मेश्राम, विश्वास बोराडे, गोरखनाथ वानखडे, जमादार खंडारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.