काँग्रेस आघाडीत आंबेडकरांच्या समावेशाचा संभ्रम कायम; कार्यकर्ते गोंंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:32 PM2019-01-18T12:32:02+5:302019-01-18T12:32:36+5:30
अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही पाऊल उचलले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: भारिप-बमसंचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले पत्ते खुले केले आहेत. भारिप-बमसं ‘एमआयएम’सोबतच निवडणूक लढविणार असून, वंचित बहुजन समाजातील १२ समाजांना प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी उमेदवार निश्चितीचेही पाऊल उचलले आहे. या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे आंबेडकरांच्या आघाडीतील समावेशाबाबत प्रचंड आशावादी असल्याची विधाने समोर येत असल्यामुळे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचाही गोेंधळ उडत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात आहे.
धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला १२ जागा देईल, त्यांच्याशी आघाडी केली जाईल, असा प्रस्ताव अॅड. प्रकाश आंबेडकरांनीकाँग्रेसला दिला होता. या प्रस्तावावर चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर केल्यामुळे आंबेडकरांचा महाआघाडीतील प्रवेशाला अडथळा आला. दरम्यानच्या काळात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मित्रपक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे ठरविले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी केवळ ८ मतदारसंघांबाबतच आघाडीचा गुंता असून, त्यापैकी कोणत्या जागा मित्रपक्षांना द्यायच्या, याची चर्चा दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू आहे. काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस हे मित्रपक्षांसाठी केवळ आठ जागा सोडू इच्छित असल्याने साहजिकच अॅड. आंबेडकरांच्या १२ जागांच्या प्रस्तावाला या वाटाघाटीत स्थान नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ अकोल्याच्या जागेसाठी अॅड. आंबेडकर आघाडीत समाविष्ट होऊन वंचित बहुजन आघाडीला वाऱ्यावर सोडण्याची सुतराम शक्यता नाही. या पृष्ठभूमीवर एकीकडे काँग्रेसने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अकोल्यात तब्बल २० उमेदवारी अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. इच्छुक उमेदवारांनी तयारीही सुरू केली असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना अॅड. आंबेडकर हे आघाडीत सहभागी होतील, चर्चा सकारात्मक सुरू आहे, असे विधान केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा मात्र गोंधळ सुरू झाला आहे.
काँग्रेसची अगतिकता कशासाठी?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत प्रचंड आशावादी असल्याचे दिसत असले, तरी अॅड. आंबेडकरांनी मात्र काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. बुधवारी त्यांनी यवतमाळात काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार टीका करून एकप्रकारे काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचेच संकेत दिले आहेत, तसेच गेल्या पंधरवड्यात बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी थेट उमेदवारच जाहीर केल्याने आता महाआघाडीचा विषयच संपविला असताना काँग्रेसची त्यांना सोबत घेण्याची अगतिकता कशासाठी, असा प्रश्नही आता काँग्रेसच्याच वर्तुळात उपस्थित होत आहे.