आंबेडकरांच्या आघाडी प्रस्तावाला ओबीसी जागरची किनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 02:50 PM2018-06-23T14:50:21+5:302018-06-23T14:54:21+5:30
अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे.
- राजेश शेगोकार
अकोला : सोशल इंजिनिअरींगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅर्टन’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आता पुरोगामी पक्षांसोबत आघाडीची तयारी दर्शविली आहे. धनगर, ओबीसी, मुस्लिम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आंबेडकरांनी केली आहे. या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला दहा जागा देईल, त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रस्ताव त्यांनी एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पुरोगामी पक्षांना दिला आहे. आघाडीच्या या प्रस्तावात व्यक्त केलेल्या अपेक्षांना भारिप-बमसंने राबवलेल्या ओबीसी जागर उपक्रमांची किनार आहे. त्यामुळे परंपरागत एक गठठा मतांसोबतच ओबीसींची मोट बांधण्याच्या अॅड.आंबेडकरांचा प्रयत्न अधोरेखीत झाला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात अॅड.प्रकाश आंबेडकरांनी ओबीसीच्या मतांची मोट बांधत प्रस्थापित भाजपासह कॉँग्रेसलाही शह दिला. जिल्हा परिषदेसारखे मिनी मंत्रालय दोन दशकांपासून याच बळावर ताब्यात ठेवले. ओबीसीमधील अनेकांना आमदार केले. भारिप-बमसंने निर्माण केलेली हीच ताकद मात्र अॅड.प्रकाश आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्यास मात्र अपुरी ठरली. या ताकदीला आघाडीच्या मतांची शिदोरी जेव्हा-जेंव्हा मिळाली तेंव्हा-तेव्हा अॅड.आंबेडकरांचा विजय झाला. या पृष्ठभूमीवर अॅड.आंबेडकरांनी आघाडी बाबत केलेले सुतोवाच आगामी निवडणुकीची रणनिती स्पष्ट करणारे ठरले आहे.
अॅड.आंबेडकरांनी अकोल्यासह पश्चिम वºहाडात ओबीसी जागर हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून हाती घेतला होता. गाव व तालुका पातळीवर ओबीसींच्या बैठका घेत त्यांनी मोर्चेबांधणी केली व अकोल्यात जानेवारी महिन्यात ओबीसींचा मेळावा घेऊन ओबीसींची एकजुट करण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यानंतर त्यांनी पंढरपुरात धनगर मेळावा घेऊन मोठा वर्ग आपल्या पक्षासोबत कसा जुळेल याचा प्रयत्न केला व आता भटक्या विमुक्तांसाठी वंचीतांचा मेळावा घेऊन ओबीसी जागर उपक्रमांला आणखी बळ मिळेल असा प्रयत्न केला आहे.
अकोला पॅर्टन मध्ये ओबीसींना उमेदवारी देऊन त्यांच्या पाठीशी आपली ‘व्होट बँक’ त्यांनी उभी करून विजय मिळविला आहे. हा धागा पकडून त्यांनी आता लोकसभेसाठी दहा जागांचा सारीपाट मांडला आहे. धनगर, माळी, ओबीसी आणि मुस्लिम समाजाकरिता प्रत्येकी दोन जागा भारिप-बमसंच्या वतिने देण्याचे त्यांचे नियोजन आहे. या समाजाची संख्या मोठी असल्याने त्याचा फायदा आपोआपच अकोला पॅर्टनला होईल असाही त्यांचा होरा असून शकतो. अॅड.आंबेडकरांनी जाहिरपणे दिलेल्या या प्रस्तावाबाबत प्रामुख्याने काँग्रेसलाच विचार करावा लागणार असल्याने आता चेंडू काँग्रेसच्या कोर्टात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील विजयाला भाजपाने काँग्र्रेसमुक्त केले आहे त्यामुळे अकोल्यासह इतर दहा मतदारसंघात काँग्रेस भारिप-बमसं सोबत तडजोड करेल का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे अॅड.आंबेडकर आघाडीसाठी इच्छुक नाहीत असा आरोप काँग्रेसच्या गोटातून नेहमीच होतो त्यामुळे आता त्यांनी काँग्रेसचे नाव जरी घेतले नसले तरी आघाडीचा दिलेला प्रस्ताव हा काँग्रेससाठी खुला आहेच .त्यातच अॅड.आंबेकडरांनी थेट समाजाची नावे घेऊन प्रतिनिधीत्व मागीतल्याने उद्या तडजोडीमध्ये एखाद्या समाजाला आघाडी करतांना डावलल्या गेले तर त्या समाजाचा रोष होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अॅड.आंबेडकरांच्या गुगलीवर काँग्रेससह इतर पुरोगामी पक्ष कसे खेळतात याकडे लक्ष लागले आहे.