काँग्रेसला दिलेला आंबेडकरांचा ‘अल्टीमेटम’ आज संपणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:47 PM2019-01-29T12:47:27+5:302019-01-29T12:48:46+5:30
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला.
- राजेश शेगोकार
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी युती करून मतांचे विभाजन टाळण्यासाठी जुलै २०१८ मध्येच अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने दोन मागण्यांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षाला दिला. त्यावर काँग्रेसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. ३० जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास ३१ जानेवारी रोजी निर्णय घेण्यास वंचित बहुजन आघाडी मोकळी राहील, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला होता. त्या ‘अल्टीमेटम’ची मुदत आज संपणार असून, काँग्रेसच्या भूमिकेवरच महाआघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाºया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान अॅड. आंबेडकरांनी काँग्रेससोबत जाण्यास अनुकूलता दाखविली असली, तरी दुसरीकडे काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी गमावली नाही. या पृष्ठभूमीवर अॅड. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीसाठी राज्यात १२ जागा देण्यात याव्यात तसेच देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या आराखड्याची अंमलबजावणी अशा स्वरूपाचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. या प्रस्तावावर काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अखेर अॅड. आंबेडकरांनी शेवटचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे.
‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट
अॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली; मात्र एमआयएम नको या मुद्यावर काँग्रेस ठाम आहे, तर दुसरीकडे अॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबतची मैत्री घट्ट करीत राज्यभरात जाहीर सभांचा सपाटा सुरू केला आहे. या सभांमध्ये काँग्रेसवर तोंडसुख घेण्याची एकही संधी आंबेडकरांनी सोडलेली नाही, हे विशेष.