लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका मेंटनन्ससाठी अमरावतीला पाठविल्या जातात; मात्र या रुग्णवाहिकांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने गत तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील रुग्णवाहिका अमरावतीलाच पडून असल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना विशेषत: गर्भवतींना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील गंभीर रुग्ण किंवा गर्भवतींना अकोला शहरात आणण्यासाठी १०८ किंवा १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची विशेष मदत होते; मात्र याच काळात जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी अमरावतीला पाठविण्यात आल्या. त्यामुळे गंभीर रुग्णांसह गर्भवतींना जिल्हा रुग्णालयात नेताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी झाला; मात्र अद्यापही काही रुग्णवाहिकांची दुरुस्ती झालीच नाही. ज्या रुग्णवाहिकांची दुरुस्ती झाली, त्यांचा दुरुस्तीचा खर्चही जास्त लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या ‘पीएचसी’तील रुग्णवाहिका नादुरुस्तजिल्ह्यातील प्रामुख्याने चतारी, पळसो बडे, आगर, दहीहांडा, अडसूळ आणि बार्शीटाकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिका नादुरुस्त आहेत. यातील काही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठवून तीन ते चार महिन्यांचा कालावधी झाला; मात्र अद्यापही यातील काही रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. तर आणखी काही रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अकोल्यातही वाहनांची दुरुस्ती शक्य...अकोल्यातही रुग्णवाहिकांची दुरुस्ती शक्य असून, त्यासाठी खर्चही कमी लागू शकतो; मात्र अमरावती येथेच वाहन दुरुस्तीचा आग्रह का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.