सचिन राऊत, अकोला: राष्ट्रीय महामार्गावर रिधोरानजीक समोरुन जात असलेल्या दुचाकीस्वाराला एका भरधाव रुग्णवाहिकेने जबर धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातात घरी जात असलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून ग्रामस्थांनी रुग्णवाहिकाचालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
रिधोरा परिसरातील राजेश डोइफोडे हे त्यांच्या दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून घराकडे जात होते. एका पेट्रोल पंपासमोर पाठीमागून आलेल्या ओझोन हॉस्पिटलच्या (एम एच ३० बीडी ०५१३) रुग्णवाहिकेला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार राजेश डोइफोडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रिधोरा व परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत राजेश डोइफोडे यांना अपघात ठिकाणावरुन हलवून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. बाळापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि त्यानंतर आरोपी रुग्णवाहिका चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला.
रुग्णवाहिका चालक मद्यधुंद अवस्थेत
ओझोन हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेने एका निष्पाप व्यक्तीचा सोमवारी रात्री बळी घेतला. रुग्णवाहिका चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन ओझोन हॉस्पिटल प्रशासनाने कोणतीही शाहनिशा न करताच रुग्णवाहिका चालकास नोकरी देउन निष्पाप लोकांचा बळी घेण्याचा परवानाचा दिल्याचा आरोप डोइफोडे यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ओझोन हॉस्पिटल प्रशासनावरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.