पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील ६४ खेडे जोडलेली आहेत. त्यामुळे येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. दररोज प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन, चार रुग्ण अती आवश्यक सेवेतील असतात, त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे घेऊन जाणे आवश्यक असते; मात्र येथील १०८ रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे १०२ रुग्णवाहिकेवर ताण वाढला आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १०८ रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आंदोलनाचा इशारा
१०८ रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णवाहिका बंद असल्याने परिणामी गोरगरीब रुग्णांना खासगी वाहनाने रुग्ण उचारार्थ पाठवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका त्वरित द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी ग्राम पंचायत सदस्य उल्हास मानकर यांनी दिला आहे.