ऑनलाइन लोकमतआपातापा : शासनाने ग्रामीण भागातील गर्भवती महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोफत रुग्णवाहीका पुरवण्याचा समावेश आहे. मात्र, शासनाच्या उद्देशाला कर्मचारी हरताळ फासत असल्याचा प्रकार आपातापा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उघडकीस आला आहे. गर्भवती महिलेला अकोला येथे दाखल करण्यासाठी रुग्णवाहीकेत घेउन जाण्यास चालकाने चक्क नकार दिल्याची घटना ११ मे रोजी घडली. या प्रकरणी सदर महिलेच्या वडीलांनी वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. आपोती खुर्द येथील विजय आपोतीकर यांची मुलगी सोनाली काळे हीस प्रसुती वेदना होत असल्याने ११ मे रोजी प्राथमिक आरोग्य केद्र आपातापा येथे दाखल केले होते. तेथे कर्तव्यावर असलेल्या आरोग्य सेविका सुशीला कळसकर यांनी तपासणी करून अकोला येथील स्त्री रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.त्यानुसार तेथील रुग्णाहीकेचे चालक चांदुरकर यांना रुग्णाला घेउन अकोला येथे चालण्याची विनंती आपोतीकर यांनी केली. मात्र, चांदुरकर यांनी नकार देउन अपमानास्पद वागणूक दिली. खासगी आॅटो करून नेण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आपोतीकर यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच यावेळी आरोग्य सेविका कळसकर यांच्याबरोबर वाद घातला. या गोंधळात मला माझ्या मुलीला अकोला येथे खासगी आॅटोने न्यावे लागले. विलंब झाल्याने रुग्णाची प्रकृती बिघडली व तिला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. एवढेच नव्हे तर सिझीरीयन करून बाळंतपण करावे लागले. रुग्णवाहीकेच्या चालकामुळे माझ्या मुलीला व मला त्रास सहन करावा लागला. त्यामुळे, या प्रकरणाची चौकशी करून रुग्णवाहीकेचा चालक चांदुरकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय आपोतीकर यांनी निवेदनात केली आहे.
या प्रकरणाची तक्रार मिळाली आहे. त्या तक्रारीची तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय जाधव यांनी चौकशीही केली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. - डॉ.बोराखडे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपातापा