अकोला - गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात अमित धुमाळे यांना बांधून ठेवून त्यांची मैत्रीण प्रतीक्षा शेंदुरकर हिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर दोघांचेही २००८ मध्ये हत्याकांड करण्यात आले होते. अकोल्यात घडलेल्या आणि राज्यभर गाजलेल्या या बहुचर्चीत हत्याकांड प्रकरणाची सुनावणी तब्ब्ल १० वर्षांनंतर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश मोनीका आरलँड यांच्या न्यायालयात २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.जुने शहरातील रेणुका नगरातील रहिवासी अमित धुमाळे (१८)आणि प्रतीक्षा शेंदुरकर (१६) हे दोघे जण एकाच वर्गात शिकणारे आणि चांगले मित्र-मैत्रीण असल्याने शिकवणी वर्ग आटोपल्यानंतर गायगाव रोडवरील बाराखोली परिसरात १४ जून २००८ रोजी गेले होते. गायगाव इंडियन आॅईल डेपोमध्ये पेट्रोल-डीझल चोरी तसेच वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींचा या परिसरात वावर होता. अमित-प्रतीक्षा दोघेही बसलेले असताना मनीष श्रीकृष्ण खंडारे रा. डाबकी रोड, हुसेन खा सुजात खा रा. गायगाव, नितीन देवराव मोरे रा. डाबकी रोड, इमाम खा सुजात खा रा. गायगाव, गुलाम आबीद गुलाम मुस्तफा रा. गायगाव, अब्दुल आरीफ अब्दुल वहाब, मंगेश भगेवार, मोहसीन खा ऊर्फ मीठ्ठू, आसीफ खा शेख अहमद ऊर्फ फकीरा शेख महेमुद, हरिदास बिल्लेवार, शेख हबीब ऊर्फ कल्या शेख मजीद, चंदन वाकोडे व शेख जहीर शेख अमीर या १३ नराधमांनी अमितला दोराने बांधून ठेवत प्रतीक्षा शेंदुरकर हिच्यावर सामूहिक बलात्कार करून दोघांचीही हत्या केली होती. त्यानंतर या निर्दयी नराधमांनी दोघांचेही मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून ते आत्महत्या करीत असल्याचा बनाव केला होता. यामधील हुसेन खा सुजात खा या बलात्काºयाने आत्महत्या करीत असल्याची खोटी सुसाईड नोटही तयार केली होती. याप्रकरणी उरळ पोलिसांनी सदर १३ आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (ग), ३०२, २०१ आणि ३४ नुसार गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि उरळ पोलिसांनी संयुक्तरीत्या करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, लोखंडी रॉड, धारदार शस्त्र, एम एच ३० जी ९४२८ क्रमांकाची दुचाकी, एम एच ३० यू १९६५ क्रमांकाची दुचाकी व दोघांच्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली होती.