लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दत्त मेडिकलचे संचालक जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल यांची ब्लॅकमेलिंग करून पैशासाठी छळ तसेच पैसे मिळतच नसल्याने अमितला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या करिश्मा शर्मा हिला पिंजर पोलिसांनी मंगळवारी मोठ्या शिताफीने अटक केली. करिश्मा शर्मा हिच्याविरुद्ध पिंजर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिच्या साथीदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.अमित सावल यांचा मृतदेह महान धरणात गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी आढळल्यानंतर कुटुंबीयांनी घातपाताची शंका पोलिसांकडे व्यक्त केली होती. अमितच्या वडिलांनी केलल्या आरोपानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच चार जणांचे बयान नोंदविण्यात आले होते. सायबर सेल तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पिंजर पोलिसांनी केलेल्या तपासात आढळलेल्या तथ्यानंतर करिश्मा शर्मा हिने अमितचा छळ केल्याचे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमितच्या भुवया आणि ओठावर काही प्रमाणात जखमा असल्याने तसेच तो एका साखळीच्या जाळ्यात अडकल्यामुळे केवळ खंडणीसाठी त्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून आधीच करण्यात आला होता. कुटुंबीयांचा आरोप आणि पोलिसांच्या तपासानंतर याप्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात करिश्मा शर्मा हिच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी तिला अटक करण्यात आली असून, तिच्या साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.मोठे रॅकेट येणार उघडकीस!अमित सावल यांना एका तरुणीने जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचेही आता समोर येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अमितला जाळ्यात ओढणाऱ्या तरुणी आणि तरुणांची एक टोळीच असून, त्यांच्याकडून या मृत्यू प्रकरणातील मुख्य धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. यामध्ये एका वकिलाचाही समावेश असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास केल्यास श्रीमंतांच्या मुलांना गंडविणारी मोठी टोळीच उघडकीस येण्याची दाट शक्यता सुत्रांनी वर्तविली आहे.
अमित सावल आत्महत्या प्रकरण : करिश्मा शर्मा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:39 PM