अकोला: आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समितीचे गठन केले आहे. या समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह विविध आघाडी, सेलच्या प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करुन त्यांच्याकडून लाेकसभा मतदार संघ निहाय कामकाजाचा केंद्रीय मंत्री अमित शाह आढावा घेणार आहेत. १५ फेब्रुवारी राेजी अकाेला शहरात दाखल हाेणारे अमित शाह राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा ‘क्लास’घेणार असल्याची माहिती आहे.
यंदा हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाची यंत्रणा ‘अॅक्शन माेड’वर आल्याचे दिसत आहे. प्रत्येक मतदार संघातून भाजपचा उमेदवार विजयी व्हावा, यासाठी राज्यात पाच लाेकसभा मतदार संघ मिळून एक ‘क्लस्टर’तयार करण्यात आले आहे. निवडणुकीची जबाबदारी निश्चित करताना सुसुत्रता यावी, यासाठी केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार संचलन समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सामील मुख्य पदाधिकारी, विविध आघाडी व सेलच्या प्रमुखांना कामाच्या स्वरुपानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक लाेकसभा मतदार संघातील राजकीय व सामाजिक समिकरणांचा इत्थंभूत आढावा घेऊन त्यानुसार पुढील रणनिती आखण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा १५ फेब्रुवारी राेजी अकाेल्यात दाखल हाेत आहेत. खुद्द केंद्रीय मंत्री अकाेल्यात येणार असल्यामुळे या आढावा बैठकीकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्रकेंद्रीय मंत्री अमित शाह यांचे गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता शिवनी विमानतळावर आगमन हाेणार असल्याची माहिती आहे. तेथून शहरातील प्रमुख मार्गावरुन थेट रिधाेरा नजिक असलेल्या हाॅटेलकडे रवाना हाेतील. यादरम्यान, मिनी बायपास मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून स्वागत केले जाइल. बैठकीत अमित शाह उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार असल्याची चर्चा आहे. दुपारी सुमारे १.१५ वाजता बैठक आटाेपून ते शिवनी विमानतळाकडे रवाना हाेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या पाच लाेकसभा मतदार संघांवर मंथनपश्चिम विदर्भातील अकाेला, बुलढाणा, वाशिम,अमरावती व वर्धा या पाच लाेकसभा मतदार संघांवर बैठकीत मंथन हाेणार आहे. यामध्ये अकाेला व वर्धा लाेकसभा मतदार संघ भाजपकडे आहे. या बैठकीत इतर तीन मतदार संघावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.